ठळक घडामोडी

भाजपाचे केंद्र सरकारला समर्थन म्हणजेच जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार; मनसेचा हल्लाबोल!

‘संध्या तेरसे यांना साथ नाही, पण केंद्र सरकारला समर्थन’; मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची भाजपावर टीका

कुडाळ : प्रतिनिधी
         दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर कुडाळ भाजपाचे केंद्र सरकारच्या भूमिकेला समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली केली.
        दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन देण्यासाठी कुडाळ भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज कुडाळ येथे एकत्र येत घोषणाबाजी करीत समर्थन दिले. यानंतर मनसेने भाजपाच्या समर्थनावर जोरदार टिका केली आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील बेरोजगार युवकांना झुरळ असा उल्लेख केल्यानंतर युवा वर्गाच्या रागातून कॉकरोज जनता पार्टीचा उदय झाला. व त्यानंतर नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोज जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपके व मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले. सदरचे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने ज्या पद्धतीने हुकूमशाहीचा वापर करत आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना बळजबरीने इस्पितळात नेले व आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज, अश्रुधुर व रबर बुलेटचा वापर केला. या गोष्टींना कुडाळ तालुका भाजपाचे समर्थन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कुडाळ नगरपंचायतीतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी सत्ताधारी असून सामाजिक प्रश्नावर प्रशासनाकडून सहकार्य होत नाही म्हणून राजीनामा दिला. त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्ष कुडाळ कोणीच उभे राहिलेले दिसून आले नाहीत. मात्र जंतरमंतर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला कुडाळ मधून भाजपचे समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!