मालवण नगरपालिकेत व्यापाऱ्यांची आक्रमक धडक
मालवण : महेश कदम
मालवण देऊळवाडा सागरी महामार्गावर अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे सोमवार पेठेतील व्यापारी, दुकानदार व भाजी विक्रेत्या महिला यांचे मोठे नुकसान होत असून सागरी महामार्गावरील आठवडा बाजार बंद करून पूर्वांपारपणे एकत्रितरित्या सोमवार बाजारपेठ येथे आठवडा बाजार भरविण्यात यावा, याबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मालवण नगरपालिकेकडे केली.
मालवण शहरातील व्यापाऱ्यांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देऊन सागरी महामार्गावरील आठवडा बाजार बंद करण्याची मागणी आक्रमकपणे केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा गावकर यांच्याशी चर्चा केली तसेच मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी मालवण व्यापारी संघाचे कार्यवाह रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष नाना पारकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष, नितीन तायशेटे, जिल्हा व्यापारी संघांचे कार्यवाह नितीन वाळके, नगरसेवक मंदार ओरसकर, सहकार्यवाह अभय कदम, सदस्य हर्षल बांदेकर, हरेश देऊलकर, सरदार ताजर, महेंद्र पारकर, हेमंत शिरपुटे, संभव कुडाळकर, प्रसाद धारगळकर, कुलराज बांदेकर, दिपक बिरमोळे, राजेश सावंत, विजय चव्हाण, हेमंत शिरगावकर, सचिन आरोलकर, सायली सामंत, गौरी सावंत, दिपाली लोके, जॉन नरोना यांच्यासह व्यापारी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मालवण सोमवार पेठ येथे शिवकाळापासून आठवडा बाजार भरत आहे. मालवण हे ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून सोमवार पेठ येथे मुख्य आठवडा बाजार भरतो. सहा वर्षांपूर्वी कोरोना काळात प्रशासकीय निर्णयानुसार पर्यायी व्यवस्था म्हणून देऊळवाडा येथे सागरी महामार्गालगत देखील आठवडा बाजार भरविण्यात आला होता. मात्र, कोरोना निर्बंध संपूनही हा अनधिकृत बाजार सुरूच आहे. या बाजारामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून ट्रॅफिक जाम व अपघातांची शक्यता वाढत आहे. बाजारासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे गावातील उपलब्ध पार्किंगवर ताण येत असून सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच बाहेरील व्यापारी महामार्गालगतच व्यवसाय करत असल्याने ग्राहक मुख्य बाजारपेठेत येत नसून स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे, यामुळे स्थानिक व्यापारी, विक्रेते यांचे नुकसान होत आहे, असेही व्यापारी म्हणाले.
तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने उभारलेल्या आधुनिक पार्किंग सुविधेमुळे सोमवार पेठ परिसरात वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. मासळी मार्केट, कोकणी मेवा, भाजीपाला व इतर पारंपरिक बाजारपेठ एकाच ठिकाणी भरल्यास शहरातील व्यापाराला चालना मिळेल, पर्यटकांनाही खरेदीसाठी अधिक सोय होईल आणि नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होईल. त्यामुळे सध्या दोन ठिकाणी भरत असलेला आठवडा बाजार बंद करून सोमवार पेठेतील पारंपारिक बाजार पूर्ववत एकाच ठिकाणी सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, येत्या सोमवारी पुढील बाजार भरण्याच्या आधी निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.
याबाबत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या, आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यावसाय व्हावा, उत्पन्न वाढावे असे नगरपालिकेलाही वाटते, त्यादृष्टीने आठवडा बाजार एकत्रितरित्या सोमवार पेठेत भरविण्यासाठी आवश्यक जागेसाठी प्रयत्न करू, रोजच्या रोज बाजार भरावा यासाठी प्रयत्न करू, भाजी मार्केटचे कामही सुरु असून ते येत्या काही महिन्यात पूर्ण होईल, आठवडा बाजार प्रश्नी आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधू असेही सौ. वराडकर म्हणाल्या. तर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नगरपालिकेच्या सभेत यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.









