चेक दिला, पेमेंट स्टॉप केले; ऑनलाइन ट्रान्सफरचा बनावट मेसेज दाखवूनही माल लंपास
तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिक फसले; पुण्यातील संशयिताविरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची गरज असल्याचे सांगून कुडाळ तालुक्यातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची तब्बल ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रुत भालचंद्र नवाथे ( ४२, रा. वडगाव बुद्रुक, आनंदनगर – पुणे) याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद नम्रता रामदास परब ( ३३, रा. हुमरमळा – वालावल ) यांनी पोलिसात दिली, असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती कुडाळ पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, नम्रता परब या पावशी- सिमावाडी येथील साई प्रोजेक्ट्स अँड इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत असून त्या सावंत इंटरप्रायझेस या संस्थेचेही अकाऊंट, बिलिंग, सेल्स, बँक व्यवहार, सप्लायर पेमेंट, पर्चेस ऑर्डर आदी आर्थिक व्यवहार सांभाळतात.
४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता विश्रुत नवाथे याने फोन करून कुडाळ – गणेशनगर येथील त्याच्या साईटसाठी कॉपर वायर, अर्थिंग वायर व इतर इलेक्ट्रिकल साहित्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने आवश्यक साहित्याची यादी मोबाईलवर पाठवून कोटेशन मागविले. परब यांनी ५ जुलै रोजी ई-मेलद्वारे कोटेशन पाठविले. त्यानंतर ७ जुलै रोजी संशयित प्रत्यक्ष दुकानात आला. त्याने आणखी इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची यादी दिली. सिलिंग फॅनबाबत चौकशी केली आणि सर्व साहित्य उपलब्ध झाल्यानंतर तातडीने पुरवठा करण्याची विनंती केली. ८ जुलै रोजी त्याने आणखी एका यादीचा टेक्स्ट मेसेज पाठविला, त्यानुसार ९ जुलै रोजी दुसरे कोटेशन पाठविण्यात आले. १.३५ लाख रू.चा माल घेऊन धनादेश दिला. ११ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजता संशयित विश्रुत रिक्षा घेऊन दुकानात आला. त्याच्या मागणीनुसार सर्व इलेक्ट्रिकल साहित्य रिक्षामध्ये भरून देण्यात आले. त्यावेळी अविनाश पुरुषोत्तम नवाथे यांच्या नावाने बिल करण्यात आले असून एकूण १,३५,९३३ रुपयांचे बिल झाले. फिर्यादीने रोख किंवा तात्काळ पेमेंटची मागणी केली असता, संशयियाताने एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेचा खाते क्रमांक व धनादेश क्रमांक असलेला १ लाख ३५ हजार ९३३ रु.चा धनादेश दिला. धनादेश स्वीकारण्याबाबत शंका व्यक्त केली असता, त्याने त्याची गणेशनगर येथे साईट सुरू असल्याचे सांगून चेक निश्चित वटेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे विश्वास ठेवून त्याला माल देण्यात आला.
धनादेश बँकेत भरल्यानंतर धक्कादायक प्रकार!
१५ जुलै रोजी हा धनादेश सारस्वत बँक कुडाळ शाखेत भरल्यानंतर संबंधित खातेदाराने पेमेंट स्टॉप केल्याचे बँकेकडून कळविण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल क्रमांक सतत बंद येत होता.
अन्य दोन व्यावसायिकांचीही फसवणूक!
या घटनेची माहिती फिर्यादीने ओळखीच्या व्यावसायिकांना दिल्यानंतर आणखी दोन फसवणुकीचे प्रकार समोर आले. आदिनारायण इलेक्ट्रिकल्स ( एस.टी. बसस्थानक समोर,कुडाळ) येथून संशयियाताने १३ जुलै २०२६ रोजी ४१ हजार ६०० रु.चे इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केले. त्या बदल्यात दिलेल्या धनादेशाचेही पेमेंट स्टॉप करण्यात आले. तसेच के. वाय. इलेक्ट्रिकल्स (पिंगुळी ) येथून २३ जुलै रोजी १ लाख ६५ हजार ९१ रु.चे साहित्य खरेदी करून ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर झाल्याचा बनावट मेसेज दाखवून माल घेऊन गेला. प्रत्यक्षात संबंधित व्यावसायिकांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नव्हती.
एकूण ३.४२ लाखांची फसवणूक
फिर्यादीनुसार, संशयिताने कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे सांगून आणि तातडीने साहित्याची आवश्यकता असल्याचे भासवून तीन व्यावसायिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सावंत इंटरप्रायझेसचे १ लाख ३५ हजर ९३३ रु., आदिनारायण इलेक्ट्रिकल्सचे ४१ हजार ६०० रू., के. वाय. इलेक्ट्रिकल्सचे १, लाख ६५ हजार ९१ रु.असे एकूण ३ लाख ४२ हजार ६२४ रु.चे इलेक्ट्रिकल फिटींग साहित्य घेऊन त्याची रक्कम न देता फसवणूक केली. या प्रकरणी विश्रुत नवाथे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट चेक, पेमेंट स्टॉप आणि खोट्या ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून अन्य व्यावसायिकांची फसवणूक करण्यात आली आले का ? याचाही तपास सुरू असल्याची माहिती कुडाळ पोलीसांकडून देण्यात आली. कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील याबाबतचा तपास करीत आहेत.









