नगरसेवक मंदार शिरसाट व शिवसेना (उबाठा) पक्षाचा पुढाकार
माजी सैनिकांच्या हस्ते कुडाळात होणार वृक्षलागवड
कुडाळ : प्रतिनिधी नगरसेवक मंदार शिरसाट आणि कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांच्या हस्ते कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. देशासाठी बलिदान आणि सेवा देणाऱ्या माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या वर्षीचे वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहीती मंदार शिरसाट यांनी दिली.
एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ हा संदेश देत कुडाळ शहरातील विविध प्रमुख आणि सार्वजनिक ठिकाणी ही वृक्षलागवड केली जाईल.या कार्यक्रमाला कुडाळ शहर शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी कुडाळमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आणि देशप्रेमी जनतेने या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट आणि कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.









