ठळक घडामोडी

सेवाशक्ती संघर्षच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण!

कुडाळात भव्य सत्कार; संवाद मेळाव्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

कुडाळ : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगाराचे कर्मचारी भरत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने कुडाळ-वेताळ बांबर्डे येथील तेली समाज हॉलमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने संवाद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगारांमधील चालक, वाहक, यांत्रिक तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, बाळू देसाई, कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, केंद्रीय कार्यकारिणी कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे, पुणे प्रदेशाध्यक्ष अमोल तांबेकर, कोल्हापूर मीडिया प्रमुख कमलाकर अत्राम, आजरा आगार सहसचिव रोहित गबाले, भाजपा कामगार मोर्चा संयोजक तथा संघटनेचे सल्लागार अशोक राणे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण, भाजपा कार्यकर्ते शैलेश जामदार आदी उपस्थित होते. भरत चव्हाण यांच्या पत्नी, आई-वडील व मुलेही सत्कार समारंभास उपस्थित होते.
      यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गोट्या सावंत यांनी, माणूस म्हणून काम करताना काही ना काही कमतरता राहू शकते. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी शक्य तेवढे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असून यापुढेही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले. राज्यात आणि देशात आपली सत्ता असल्याने संघटनेने मांडलेले कर्मचाऱ्यांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्रास होईल, त्या ठिकाणी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही सावंत यांनी सांगितले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे संघटनेला नेहमीच सहकार्य मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
      भरत चव्हाण यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झालेली निवड कोणत्याही शिफारशीमुळे झालेली नसून, त्यांनी गेल्या काही वर्षांत संघटना वाढीसाठी केलेल्या योगदानाचे हे फळ असल्याचे सावंत यांनी सांगितले. भरत चव्हाण यांना केंद्रीय कार्यकारिणीवर स्थान दिल्याबद्दल संघटनेचे संस्थापक आमदार गोपीचंद पडळकर यांचे त्यांनी आभार मानले.
      सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी एसटी बसेसच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. एसटी चालक-वाहकांना खराब अवस्थेतील बसेस चालवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारने खरेदी केलेल्या लालपरी व जिजाऊ बसेस पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विभागाला मोठ्या प्रमाणात मिळाल्याने चालक-वाहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सीएनजी बसेसमुळे अनेकदा वेळापत्रक कोलमडत असल्याने यावर केंद्रीय कार्यकारिणीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
      यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई आणि संघटनेचे सल्लागार अशोक राणे यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रीय कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली.
     सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळेच सिंधुदुर्गातील सर्व आगारांमध्ये संघटना वाढविता आल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांसाठी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामकाजात सुधारणा व्हावी, या उद्देशाने आपण काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
      एसटीचे निवृत्त कर्मचारी व संघटनेचे सल्लागार अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणी मार्गी लावण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये संघटनेला कर्मचाऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, त्याचेच प्रतिबिंब या संवाद मेळाव्यात दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुडाळ आगारातील प्रशांत गावडे व दिनेश शिरवलकर यांच्या टीमने मेहनत घेतली.
      यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय कार्यकारी सदस्य स्वप्निल रजपूत, महादेव भगत, प्रशांत गावडे, मनोजकुमार पवार, शैलेंद्र परब, बाबली तुळसकर, विभागीय कार्यशाळेचे अविनाश रणसिंग, अरुण पिळणकर, देवगड आगार अध्यक्ष प्रथमेश घाडी, सचिव साई ओटवकर, विभागीय कार्यालय अध्यक्ष पप्या गावडे, सचिव पंकज कासार, कणकवली सचिव वैभव घोणे, विजयदुर्ग अध्यक्ष पप्प्या मिठबावकर, सचिव रोहन शिंदे, सावंतवाडी अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सचिव आबा माणगावकर, वेंगुर्ला सचिव दाजी तळवणेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध आगारांमधील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!