कुडाळ कोमसाप तर्फे ‘ये रे घना’ काव्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य
कुडाळ : साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षाखालील युवकांसाठी एखादे कवी संमेलन घ्यावे, अशी सूचना सीए के. एल. फाटक यांनी केली. जगातिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीने येथील संत राऊळ महाराज महाविद्यलयात आयोजित केलेल्या ‘ये रे घना’ कवी संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कवी संमेलनाला कुडाळ तालुक्यासोबतच जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद लाभला.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य संमेलन कुडाळ शाखेच्या वतीने या ‘ये रे घना’ कविसंमेलनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कवीसंमेलनाचा शुभारंभ झाला. आपल्या मनोगतातून ना. बा. रणसिंग यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. दीपाली काजरेकर यांनी केले. यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, माजी अध्यक्ष अनंत वैद्य, कुडाळ शाखेचे अध्यक्ष संतोष वालावलकर, कार्यवाह सुरेश पवार, ज्येष्ठ साहित्यिक सीए के. एल. फाटक, वृंदा कांबळी, संदीप साळसकर,निलेश जोशी उपस्थित होते. उदघाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन स्नेहा फणसळकर यांनी केले.
त्यांनतर सीए के. एल. फाटक यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाला सुरुवात झाली. कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागातून कवी या कविसंमेलनात सहभागी झाले होते. त्यांनी पाऊस या विषयासोबतच अन्य विषयांवर देखील कविता सादर केल्या. सादरीकरणात देखील विविधता होती. मालवणी कवितांची मेजवानी देखील काही कवींनी दिली.
यावेळी अनंत वैद्य, डॉ. दीपाली काजरेकर, प्रा. संतोष वालावलकर, सुरेश पवार, स्नेहा फणसळकर, स्वाती सावंत, यांच्यासह नेहा कशाळीकर, राजेंद गोसावी, कृष्णा गवस, रामचंद्र शिरोडकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर, मनीषा पाताडे, मनोहर सरमळकर, सदानंद रानडे, श्रावणी मढव, आर्यन गोलतकर, दीपा मेस्त्री, मेधा मणेरीकर, संदीप साळसकर, अदिती मसुरकर, पी.बी. कदम, रिमा भोसले, राजन भोसले, प्रा. डॉ. एस. टी. आवटे, आर्या जडये यांनी आपापल्या कविता सादर केल्या.
कविसंमेलनाचे अध्यक्ष के. एल. फाटक यांनी देखील आपली १९५४ सालात लिहिलेली पावसावरची कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेची साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन सदस्य करा. तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन द्या असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून करून सर्व सहभागी सर्व कवींचे अभिनंदन केले.यावेळी कवी अनंत वैद्य यांनी सुद्धा मौलिक मार्गदर्शन केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले.









