गणेशघाटाचे काम दोन वर्षे रखडले, आता पूर्ण होत असल्याचे समाधान – वैभव नाईक
माजी आमदार वैभव नाईकांकडून कामाची पाहणी;
कुडाळवासीयांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याची दिली प्रतिक्रिया
कुडाळ : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी आज मंगळवारी कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकाठावरील गणेशघाट तसेच सुशोभीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी वैभव नाईक म्हणाले की, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकिनारी सुशोभीकरणासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पाठपुरावा केला होता. त्यातून गणेशघाटासाठी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच भंगसाळ नदीकिनारील सुशोभीकरणासाठी जमीन संपादनाकरिता ५ कोटी रुपये आणि सुशोभीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी आम्ही आणला होता. या कामाची पाहणी करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. खरंतर कुडाळवासियांसाठी जो शब्द आम्ही दिला होता, तो शब्द आता पूर्ण होत आहे. जसे की, भंगसाळ नदीकाठावर सुशोभीकरण होत आहे. कुडाळवासीयांना दिलेला शब्द आता पूर्ण होत असून भंगसाळ नदीकाठाचे सुशोभीकरण प्रत्यक्षात साकारत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी या ठिकाणी केटी बंधारा बांधण्यात आला असून नदीच्या एका बाजूला संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूच्या संरक्षक भिंतीसाठीही मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, सत्ताधारी नगरपंचायतीने आवश्यक पाठपुरावा न केल्याने हे काम रखडल्याचा आरोप नाईक यांनी केला. मंदार शिरसाट यांच्यासह आम्ही सर्व जण या कामासाठी पाठपुरावा करून हेही काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ असे नाईक यांनी स्पष्ट केले.
गणेशघाटाच्या कामाबाबत दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे सांगताना नाईक म्हणाले की, आमची सत्ता नसल्याने गेली दोन वर्षे हे काम रखडले होते. मात्र, आता गणेशघाटाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने समाधान आहे. यावेळी अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, बाळा पावसकर, योगेश धुरी, सुशिल चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, अमित राणे, हर्षद काळप, शैलेश काळप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









