‘दोन निवडणुका झाल्या, तरी पक्ष-चिन्हाचा निकाल नाही’; वैभव नाईक आक्रमक
‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे की नाही, पक्ष नेतृत्वाने ठरवावे’
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून सुरू असून प्रशासनातील भ्रष्टाचारामुळेच हा महामार्ग अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही, हि वस्तुस्थिती आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाबाबत टक्केवारीचा जो आरोप केला आहे, तो वास्तव असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांची झालेली दुरवस्था यावरून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकाठावरील गणेशघाट व सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून सुरू आहे. गेल्यावर्षी शिवसेनेने महामार्गाच्या प्रश्नावर दोनवेळा आंदोलन केले. यावेळी एका अधिकाऱ्याने शिवसैनिकांविरोधात खोटी तक्रार दाखल केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ३२ जणांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, महामार्गाचे काम का रखडले आहे, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे. प्रशासनातील भ्रष्टाचारामुळेच हा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला टक्केवारीचा आरोप चुकीचा नसल्याचे नाईक म्हणाले.
महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नांदगाव आणि झाराप येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांच्या कामालाही वर्ष पूर्ण झालेले नाही. तरीही या पुलांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले असून ते कोसळण्याच्या स्थितीत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. महामार्गाच्या कामात टक्केवारीचा प्रकार असल्याने कामांचा दर्जा खालावला आहे. कुडाळ शहरातून भंगसाळ नदीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. सरकारच्या कामांमध्ये टक्केवारीचा प्रकार असल्याने निर्णय चुकीचे घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीबाबत बोलताना नाईक म्हणाले की, या प्रकरणाला चार वर्षे पूर्ण झाली असून आता पाचवे वर्ष सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणात सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फुटीर खासदारांच्या पाठीशी राहण्याबाबत केलेल्या विधानांमुळे हस्ते-परहस्ते दबाव आणला जात असल्याने पक्ष व चिन्हाच्या निर्णयाला विलंब होत असल्याचे नाईक म्हणाले. आतापर्यंत दोन निवडणुका झाल्या आहेत. हा निर्णय यापूर्वी झाला असता तर निवडणुकीच्या निकालातही मोठा फरक पडला असता. मात्र, आमच्या बाजूचा निकाल आहे तो आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीएसोबत सत्तेत जाण्याच्या चर्चेबाबत वैभव नाईक यांनी पक्ष नेतृत्वाला स्थानिक व राज्य पातळीवर भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करण्याचे सूचित केले. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सत्तेसोबत राहिली आहे. आणि नेहमीच ते सत्तेच्या बरोबर राहतात. त्यामुळे आम्हाला स्थानिक पातळीवर तसेच राज्य पातळीवर काम करताना यापुढील काळात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे की नाही याचा विचार पक्ष नेतृत्वाचे केला पाहिजे, असे मोठे विधान त्यांनी यावेळी केले.
‘दीड-दोन कोटींचा रस्ता सहा महिन्यांत उखडला; जबाबदार कोण?-वैभव नाईक
कुडाळ भंगसाळ नदीकाठावरील गणेशघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करताना वैभव नाईक यांनी रस्त्याच्या कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित केला. पतन विभागामार्फत दिड कोटी रूपये खर्च करून हा रस्ता नव्यानेच करण्यात आला होता. मात्र, अल्पावधीतच रस्त्याचा काही भाग उखडला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पुन्हा रस्ता करण्याच्या नावाखाली केवळ थुकपट्टी लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जवळपास दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता अवघ्या सहा महिन्यांत उखडत असेल तर याला प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा प्रकार असल्याने रस्त्याची ही अवस्था झाली आहे. पतन विभागाच्या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोपही वैभव नाईक यांनी यावेळी केला.









