

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव
सलग सातव्यांदा दिल्ली दौरा : मालक दिनेश गोरे यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
कोकणची सुमारे आठशे वर्षांची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्य मंडळ, कवठी-कुडाळने मानाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. या मंडळाने विविध राज्यांमध्ये दशावतारी नाट्यप्रयोग सादर करून गौरव प्राप्त केला असून, नाट्य मंडळाचे मालक दिनेश गोरे यांचा विविध संस्थांमार्फत तब्बल ९९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून आता शंभराव्या पुरस्काराचा बहुमान मिळणार असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा दिमाखदार सोहळा होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्य मंडळ रविवारी दिल्लीला रवाना झाले आहे. सलग सातव्यांदा दिल्ली दौरा करणाऱ्या या मंडळाला राष्ट्रपती भवनात दशावताराचा नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी मिळाली आहे. या निमित्ताने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते मंडळाचा सन्मान होणार असल्याची माहिती मंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांनी दिली.
बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळाने आतापर्यंत पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उज्जैन, इंदोर, सिंहस्थ कुंभमेळा, धुळे, नाशिक, पंचवटी, शिर्डी, पंढरपूर, अमरावती, विदर्भ, तिरुअनंतपुरम, केरळ, कर्नाटक, गोवा, पुणे, मुंबई आदी विविध ठिकाणी दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले आहेत. भारत रंग महोत्सवासह विविध राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्येही मंडळाने सहभाग घेतला आहे.
कोकणातील आद्य लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशावताराचा वारसा जपणाऱ्या गोरे घराण्याची ही दहावी पिढी आहे. बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांनी वडिलांच्या पश्चात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मंडळाची धुरा सांभाळली आहे. आर्थिक अडचणी असतानाही श्रद्धा, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी पारंपरिक दशावताराला नवी उंची मिळवून दिली.
पौराणिक तसेच महाभारतावर आधारित नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम मंडळ सातत्याने करीत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर या मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
शंभरावा पुरस्कार ठरणार ऐतिहासिक
दिनेश गोरे म्हणाले, आतापर्यंत ९९ पुरस्कारांनी गौरव झालेल्या या दशावतारी मंडळाचा शंभरावा पुरस्कार राष्ट्रपती भवनात होणार असल्याने हा क्षण कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोकणासाठी अभिमानाचा ठरणार आहे. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या कार्यक्रमामुळे दशावतार या पारंपरिक लोककलेला राष्ट्रीय स्तरावर राजाश्रय मिळण्याचा मार्ग अधिक भक्कम होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. “श्री गणपतीच्या आशीर्वादाने आणि अनेकांच्या सहकार्याने आजपर्यंत मंडळाचा प्रवास सुरू आहे. अत्यंत कष्टाने आणि श्रद्धेने जपलेली ही लोककला राष्ट्रपती भवनात सादर करण्याची संधी मिळणे, तसेच शंभरावा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आणि संपूर्ण गोरे घराण्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे,” अशी भावना दिनेश गोरे यांनी व्यक्त केली. गोरे मंडळाच्या या ऐतिहासिक दिल्ली दौऱ्याबद्दल कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.









