ठळक घडामोडी

गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे; श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट!

वैभव नाईकांच्या दाव्यावर कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांचे प्रत्युत्तर

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष निधी उपलब्ध – बांदेकर-शिरवलकर

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ भंगसाळ नदीकिनारी गणेश घाट व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून या कामांसाठी आपणच निधी आणल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे,’ अशा मानसिकतेतून हा प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी वैभव नाईकांवर केली आहे.
      गणेश घाटाचे काम मंजूर असणे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी उपलब्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. निधीअभावी हे काम रखडले होते. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपंचायतीला प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आणि त्यानंतर कामाला वेग आला, असा दावा नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
     गेल्या सहा महिन्यांपासून आपण या कामावर सातत्याने लक्ष ठेवून आढावा घेतला व अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एका दिवसाच्या स्थळ पाहणीने गणेश घाट उभा राहत नसतो; त्यासाठी सातत्याने काम करावे लागते,’ असा टोला त्यांनी लगावला. गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे आलेले असताना श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत ‘प्रत्यक्ष काम कोणी केले आणि निधी कोणी उपलब्ध करून दिला, हे कुडाळवासीयांच्या डोळ्यांसमोर आहे,’ असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
      माजी आमदारांच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळावरही त्यांनी टीका केली. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी श्रेयाची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कुडाळवासियांनी आमदार निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सातत्याने काम सुरू आहे. ‘२१ व्या शतकातील आधुनिक, सुंदर आणि विकसित कुडाळ घडविण्याचा शब्द आम्ही पूर्ण करू. श्रेयासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष विकासासाठी आमचे काम सुरू आहे,’ असा विश्वास नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!