नागरिकांच्या सतर्कतेमुळे चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन
कुडाळ पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू
कुडाळ : पिंगुळी येथील भूपकरवाडी परिसरात आज एक परप्रांतीय अनोळखी व व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पिंगुळी गोंधळ पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीची चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती मिळून न आल्याने त्यांनी तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पिंगुळी पोलीस पाटील सतीश माडये तसेच व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून सदर संशयास्पद व्यक्तीस कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांकडून सदर इसमाची चौकशी करण्यात आली. सदर इसम बोलत असलेल्या बोलीभाषेवरून परप्रांतीय असल्याचा स्थानिक ग्रामस्थांमधून सांगण्यात आले. तो या परिसरात का आला?, नेमका तो कुठून आला? याबाबतची चौकशी पोलिसांकडून करण्यात आल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने केलेल्या कार्यवाहीमुळे या घटनेची वेळीच दखल घेण्यात आली.









