
रायगडावरील ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात योगदान देणाऱ्या शिवभक्तांचा सन्मान
मुंबई : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने आयोजित ‘जागर शिवराज्याभिषेकाचा – सन्मान शिवसमिधांचा २०२६’ या ऐतिहासिक उपक्रमाचे स्नेहसंमेलन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात उत्साहपूर्ण आणि शिवमय वातावरणात संपन्न झाले.
रायगडावर नुकत्याच पार पडलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या असंख्य शिवभक्त, सेवेकरी, कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतकांच्या अथक परिश्रमांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून स्वराज्याच्या विचारांची, संस्कृतीची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा जागर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार आणि राज्याभिषेकाची ऐतिहासिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी समितीच्या वतीने करण्यात आला.
या स्नेहसंमेलनास महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा सोहळ्याचे स्वागताध्यक्ष श्री. भरतशेठ गोगावले, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, ज्येष्ठ नाणीसंग्राहक व INTACH चे चेअरमन श्री. अशोक ठाकूर, ज्येष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब, इतिहास संशोधक, लेखक व व्याख्याते डॉ. केदार फाळके, श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) चे संस्थापक व ‘शिवाजी महाराज – द ग्रेटेस्ट’ या पुस्तकाचे लेखक श्री. हेमंतराजे गायकवाड, धर्मवीर संभाजी राजे भाजी मार्केट संकुल चे अध्यक्ष श्री. गणेश पावगे, रायगड रोपवेचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र खातू तसेच राजपुरोहित श्री. प्रकाश स्वामी जंगम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान रायगडावर पार पडलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या ३५४ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन, विविध उपक्रम आणि भविष्यातील संकल्प याबाबत उपस्थित शिवभक्तांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याची परंपरा, त्यामागील इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. तसेच आगामी राज्याभिषेक सोहळ्यासाठी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार यांनी शिवभक्तांना प्रेरणादायी संदेश देताना, “रायगडावर केवळ दर्शनासाठी नव्हे, तर स्वराज्याचा इतिहास अनुभवण्यासाठी आणि या पवित्र कार्याचे सेवेकरी म्हणून सहभागी होण्यासाठी शिवभक्तांनी पुढे यावे,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिवभक्त, सेवेकरी, कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतकांचे श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सचिव श्री. समीर वारेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सनी ताठेले, श्री. रंजन गावडे, श्री. किरण शिंदे, श्री नीलेश सकट, श्री. राजू देसाई, श्री. राहुल मांडवकर आणि श्री. संदीप जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
‘जागर शिवराज्याभिषेकाचा’ हा उपक्रम केवळ एका सोहळ्यापुरता मर्यादित न राहता स्वराज्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि रायगडाची प्रेरणा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा व्यापक संकल्प घेऊन पुढे सुरू राहणार असल्याचे समितीच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.










