
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडेंची कुडाळ एसटी आगार प्रशासनाकडे मागणी
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना भोसले नॉलेज सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चराटा (ता.सावंतवाडी) येथे शिक्षणासाठी दररोज खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक व वेळेची गैरसोय दूर करण्यासाठी कुडाळ ते भोसले कॉलेज या मार्गावर सकाळी ८ ३० आणि सायंकाळी ५.१५ वाजता एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज कुडाळ एसटी आगार प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले.
कुडाळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी भोसले नॉलेज सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चराटा, सावंतवाडी येथे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी आहे. मात्र, या वेळेत कुडाळ ते महाविद्यालय या मार्गावर थेट एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने कुडाळ, पिंगुळी, ओरोस, कळसुली, आंब्रड आदी भागांतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
खासगी वाहनाने प्रवास करताना विद्यार्थ्यांना जादा भाडे द्यावे लागत असून त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून कुडाळ बसस्थानकातून सकाळी ८.३० वाजता भोसले कॉलेजकडे बसफेरी तसेच सायंकाळी ५.१५ वाजता भोसले कॉलेजमधून कुडाळकडे बसफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही बससेवा तातडीने सुरू केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहरप्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, इम्तियाज शेख, प्रथमेश कांबळी, भाई सडवेलकर आदी उपस्थित होते.










