
देवगड तालुक्यातील घटना
देवगड : गुरांच्या मालकीच्या वादातून नातवाने आपल्या आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दहिबांव-बांबकरवाडी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर रामजी बांबकर (८४) हे घराजवळील गोठ्यातील गाईचे दूध काढत असताना त्यांचा चुलत नातू अक्षय चंद्रकांत बांबकर (३२) तेथे आला. गुरांच्या मालकीवरून व गाईचे दूध काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अक्षय याने मधुकर बांबकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नी आनंदी मधुकर बांबकर (७०) यांच्यावरही संशयिताने कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली.
घटनेनंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी प्रथम देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी आनंदी बांबकर यांनी देवगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित अक्षय बांबकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 118(2), 131, 351(2)(3), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी देवगड पोलिस ठाण्याला भेट देऊन प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेचा अधिक तपास देवगड पोलिस निरीक्षक श्याम बुवा करीत आहेत.










