
कुडाळ : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील RAWE अंतर्गत कृषिकन्यांनी आवळेगाव ग्रामपंचायतीमध्ये आयोजित भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताने करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. पूर्वा सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपसरपंच विवेक कुपेरकर, ग्रामपंचायत सदस्य , शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी श्री. अनिल मोहन सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृती रॅली, वृक्षारोपण आणि धूम्रपान न करण्याची शपथ असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांद्वारे देशप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली.
तसेच आवळेगाव पोलीस ठाणे येथे सायबर गुन्हे जनजागृती सत्र घेण्यात आले. पोलिस दल क्षेत्रातील मुख्य अधिकारी तिवरेकर यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात कृषिकन्या दुर्गा मोडक, विशाखा सूर्याजी, सृष्टी बोले, किर्ती गुरव आणि सायली धुरी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये सामाजिक, पर्यावरणीय, आरोग्यविषयक आणि सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती झाली.










