ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर कणकवलीत रस्त्यांवरील खड्डे बुजविले!

सा.बां.विभागाकडून एका रात्रीत दुरूस्ती

वाहनधारक;नागरिकांतून समाधान

कणकवली : प्रतिनिधी
       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अचरा मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आले.
    कणकवली नगरपंचायत व जिल्हा परिषद हद्दीतील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठी वर्दळ वाढणार असल्याने तसेच रस्त्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन हे खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने एका रात्रीत अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अचरा मार्गावरील खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी सुकर केला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिक व वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
     दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील इतर रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!