ठळक घडामोडी

कुडाळ हायस्कूल परिसरातील चिखलाचा प्रश्न मार्गी; नगरसेवक अभिषेक गावडे यांचा तातडीने पुढाकार!

विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय दूर; खडी टाकून चिखलमय रस्त्याला दिलासा

शिवसेना शहरप्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक

कुडाळ : पावसामुळे कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच पडतेवाडी शाळेसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या परिस्थितीमुळे विद्यार्थी, पालक तसेच वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने शाळा सुटण्याच्या वेळेत या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.
      पावसाचे पाणी आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. पालकांना आपल्या मुलांना घेण्यासाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच वाहनांची पार्किंग आणि ये-जा करणेही कठीण झाले होते. अनेक वाहनचालकांना चिखल टाळण्यासाठी रस्त्याच्या धोकादायक बाजूने वाहने काढावी लागत होती. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही निर्माण झाली होती.
     ही परिस्थिती शिवसेना शहर प्रमुख तथा कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने याची दखल घेत प्रशासनाच्या माध्यमातून सदर ठिकाणी खडी टाकून ती व्यवस्थित पसरवून घेतली. त्यामुळे चिखलमय झालेला परिसर अधिक सुस्थितीत झाला असून विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करणे शक्य झाले आहे.
      विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पालकांची गैरसोय आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन तातडीने केलेल्या या उपाययोजनेमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
      लोकप्रतिनिधी म्हणून केवळ मोठमोठ्या घोषणा न करता सामान्य नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणी स्वतःहून ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे, हीच खरी लोकसेवा आहे. अभिषेक गावडे यांनी आपल्या कृतीतून संवेदनशील लोकप्रतिनिधीची भूमिका अधोरेखित केली आहे.

error: Content is protected !!