ठळक घडामोडी

‘तुमची बचत, तुमची सुरक्षा, तुमची सेवा’; जुन्या खात्यांची माहिती घेण्याचे डाक विभागाचे आवाहन!

सिंधुदुर्गात ३३ हजारांहून अधिक सुप्त खाती; दीड कोटींची रक्कम पुन्हा खातेदारांपर्यंत पोहोचविण्याचा डाक विभागाचा प्रयत्न

डाक विभागाची डिजिटल क्रांती; बचत, विमा, आधार, बँकिंगसह पार्सल-लॉजिस्टिक्सच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

कुडाळ : प्रतिनिधी
       भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या डाक विभागामार्फत आज केवळ पत्रे व पार्सल वितरणाची सेवा न देता बचत, विमा, बँकिंग, आधार, डिजिटल सेवा तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल आणि लॉजिस्टिक्सच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सेवांबाबत जनजागृती करण्याबरोबरच अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या डाकघर खात्यांमधील जमा रक्कम खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा जनजागृती उपक्रम प्रस्तावित आहे. बंद असलेली खाती संबंधित खातेदारांपर्यंत पोचून पुनरुज्जीवित करणे हा भारतीय डाक खात्याचा उद्देश आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत कुडाळ औद्योगिक समूह डाकघराचे पोस्टमास्तर विकास वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      कुडाळ येथे बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. वर्मा बोलत होते. यावेळी डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नितीन नेमळेकर, प्रकाश गावडे, संदीप कसपले, रविकांत मोर्ये, ज्ञानेश्वर आळवे, शुभम घिगे व गिरीश बावलेकर आदी उपस्थित होते.
     श्री. वर्मा म्हणाले, “तुमची बचत, तुमची सुरक्षा आणि तुमची सेवा” यासाठी डाक विभाग नेहमीच कार्यरत आहे. डाकघरांमध्ये अनेक अशी खाती आहेत ज्यामध्ये दीर्घकाळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अनेक खातेदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या खात्यांची माहिती नसू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या कुटुंबातील जुनी बचत, आरडी, टीडी, एमआयएस, एनएससी, केव्हीपी आदी खाती जवळच्या डाकघरात जाऊन नक्की तपासावीत. तुमचे जुने खाते केवळ एक रेकॉर्ड नसून, तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीची बचत असू शकते, असे आवाहनही श्री. वर्मा यांनी केले.
     डाकघरांमध्ये नागरिकांसाठी विविध अल्पबचत योजना उपलब्ध आहेत. यामध्ये बचत खाते, आरडी, टीडी, एमआयएस, एससीएसएस, पीपीएफ, एनएससी, केव्हीपी, सुकन्या समृद्धी योजना आदींचा समावेश आहे. या योजनांचे व्याजदर भारत सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योजनांची माहिती जवळच्या डाकघरातून घ्यावी.डाक विभागाचे प्रमुख सेवा क्षेत्र म्हणजे बचत व वित्तीय सेवा, विमा, मेल, स्पीड पोस्ट, पार्सल व लॉजिस्टिक्स, व्यापार विकास, आधार सेवा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा होय. या निमित्ताने नागरिकांनी आपल्या जुन्या डाकघर खात्यांची माहिती घ्यावी तसेच आपल्या कुटुंबातील जुन्या खात्यांचीही तपासणी करावी. आपल्या बचतीकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन श्री. वर्मा यांनी यावेळी केले.
       श्री.नेमळेकर म्हणाले, सर्वात मोठी बचत खाती पोस्टात आहेत. ही लाखो, करोडो रूपयांची खाती आहेत. यातील मोठ्या प्रमाणातील खाती बंद आहेत. यातील काही खातेदार मयत असून, त्यांच्या वारसांना याची कोणतीही माहीती नसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तम पोस्टात पडून आहे. त्यामुळे जुनी खाती चालू करून, संबंधितांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठीच डाक खात्याचा हा उपक्रम आहे. डाक खात्याने आता डिजिटल क्रांती केली असून नवनवीन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी नजिकच्या पोस्ट कार्यालयात जाऊन खात्यांची माहीती घ्यावी तसेच नवनवीन सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
     श्री.गावडे यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील जवळपास बंद असलेल्या ३३ हजारांहून अधिक खात्यांचा समावेश असून दिड कोटी रूपये रक्कमेचा समावेश आहे. बंद असलेली खाती पुर्नर्जीवीत करणे हा आमचा उद्देश आहे. श्री.कसपले म्.म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ कोटी ४२ लाख रूपये एवढी विमा रक्कम जमा झाली आहे. नागरिकांनी भारतीय टपाल विम्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
     श्री.मोर्ये म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्यासाठी भारतीय डाक विभाग सज्ज आहे. डाक विभागाच्या पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनांद्वारे नागरिकांना जीवन विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत विमा संरक्षण पोहोचविण्यात रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स महत्त्वाची भूमिका बजावत आहे.डाक विभाग आता वैयक्तिक ग्राहकांसोबतच व्यापारी, एमएसएमई आणि ई-कॉमर्स व्यवसायांसाठीही महत्त्वाचा लॉजिस्टिक पार्टनर म्हणून कार्यरत आहे. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल पार्सल सेवांसोबतच व्यापारी ग्राहकांसाठी नियमानुसार बिझनेस अँग्रीमेंटची सुविधा उपलब्ध आहे. व्यापारी आपली उत्पादने देशातील विविध भागांत तसेच परदेशात पाठविण्यासाठी जवळच्या डाकघराशी संपर्क साधू शकतात. डाकघरांमध्ये उपलब्ध सुविधेनुसार नागरिकांना आधार एनरोलमेंट व अपडेट, मोबाईल नंबर अपडेट, डिजिटल व फायनान्शियल सेवा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

error: Content is protected !!