
कुडाळ पोलिसांची कारवाई; तपास सुरू
साहित्य घेतले, पेमेंट थांबवले; बनावट पेमेंट मेसेज दाखवून फसवणूक उघड
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून कुडाळ तालुक्यातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची सुमारे ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अलिकडेच घडला आहे. याबाबत कुडाळ पोलीसात फिर्याद दाखल कसून संशयिताविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
४ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत संशयिताने इलेक्ट्रिकल साहित्याची मागणी करून तीन व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात साहित्य घेतले. धनादेशाचे पेमेंट स्टॉप करणे तसेच ऑनलाइन रक्कम जमा झाल्याचा बनावट मेसेज दाखवून साहित्य घेण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी संशयिताच्या मुसक्या कुडाळ पोलिसांनी आवळून त्याला ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.










