
कुडाळ : श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव प्रशालेत स्वातंत्र्यदिन जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तीन दिवस ध्वजवंदन व भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. या औचित्याने शासनस्तरावरून दिलेले विविध उपक्रम व स्पर्धा अतिशय उत्साहात घेण्यात आले. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, रंगभरण स्पर्धा, पोष्टर मेकिंग व चित्रकला स्पर्धा, सीमेवरील सैनिकांना राख्या व शुभेच्छा संदेश, जनजागृती फेरी व प्रभात फेरी, समुहगीते, समुहनृत्य, कवायत, घोषणा, नशामुक्ती शपथ, निपुण साक्षर प्रतिज्ञा, कॉपीमुक्त विद्यार्थी शपथ, महिला सुरक्षा व सक्षमीकरण शपथ, पोलिसदूत विद्यार्थी सन्मान तसेच स्कॉलरशीप गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा व उपक्रमांत उत्साहाने सहभाग घेतला. प्रशालेने क्रांतिदिनापासूनच या उपक्रमांना सुरुवात केली होती.या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभिमान जागृत करणे, स्वातंत्र्याच्या इतिहासाची ओळख, क्रांतिवीरांचे कार्य, प्राणांचे बलिदान देणाऱ्या देशभक्तांप्रति आदरभाव, कृतज्ञता, सांस्कृतिक वारसा जोपासणे अशा विविध मूल्यांची जोपासना या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये होत असते. त्यामुळे सर्व स्तरांतून या अनोख्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी संस्था संचालक सर्वश्री चंद्रशेखर जोशी, योगेश फणसळकर, बाळा जोशी, विनायक नानचे, मेघःशाम पावसकर, विजयप्रकाश आकेरकर, राजू रांगणेकर, मुख्या. चंद्रकांत चव्हाण, सर्व शिक्षक- शिक्षकेतरवृंद, पालकवर्ग आदी कार्यक्रमास उपस्थित होते.










