ठळक घडामोडी

ओरोसजवळ महामार्ग ठरतोय जीवघेणा; निकृष्ट बॅरिकेड्समुळे सर्व्हिस रोडवर अपघातांचा धोका!

ग्रा.पं.सदस्य योगेश तावडेंची तातडीच्या उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे; RCC क्रॅश बॅरिअर्सची मागणी, अन्यथा आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणे आणि वाहनांचा बेफाम वेग आता सर्व्हिस रोडवरील नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील ओव्हरस्पीड वाहने नियंत्रण सुटल्यावर महामार्ग आणि सर्व्हिस रोडमधील निकृष्ट दर्जाचे बॅरिकेड्स तोडून थेट सर्व्हिस रोडवर येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ओरोस ग्रामपंचायत सदस्य योगेश राजाराम तावडे यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.
      ओरोस परिसरातील महामार्गावर काही ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असल्याचे तावडे यांनी निवेदनातून निदर्शनास आणले आहे. वेगावरील नियंत्रण सुटलेल्या वाहनांना अडविण्यासाठी महामार्ग आणि सर्व्हिस रोडमध्ये उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स सक्षम नसल्याने अपघातग्रस्त वाहने थेट सर्व्हिस रोडवर येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
      सर्व्हिस रोडही सुरक्षित नाही!
       महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचारी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र महामार्गावरील वाहन कधीही सर्व्हिस रोडवर येऊन आदळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सर्व्हिस रोडवरून प्रवास करताना जीव मुठीत घेण्याची वेळ आल्याचे तावडे यांनी म्हटले आहे.
      RCC क्रॅश बॅरिअर्सची मागणी
      महामार्गाच्या धोकादायक वळणांवर उच्च दर्जाचे क्रॅश बॅरिअर्स किंवा RCC सुरक्षा भिंती उभाराव्यात, रंबल स्ट्रिप्स बसवाव्यात, वेगमर्यादेचे फलक लावावेत आणि संपूर्ण परिसराची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी तावडे यांनी केली आहे.
      अपघात होऊन जीव गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने आताच जागे व्हावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही तावडे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!