ठळक घडामोडी

कुडाळ शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू!

यादीत नाव नसलेल्या एकल महिलांनी २५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी; कुडाळ नगरपंचायतीचे आवाहन

एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माहिती संकलन; नगरपंचायतीकडून सर्वेक्षण

कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांची नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
      या सर्वेक्षणासाठी शासनाकडून निर्धारित नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार एकल महिलेचे संपूर्ण नाव, एकल प्रकार, वय, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, शैक्षणिक माहिती, उदरनिर्वाहाचे साधन, मासिक उत्पन्न, दिव्यांगत्वाची माहिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, दारिद्र्यरेषेखालील स्थिती, बचत गटातील सदस्यत्व तसेच शासकीय योजनांचा लाभ घेत असल्यास त्याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
      कुडाळ शहरातील पात्र एकल महिलांनी आपले नाव एकल महिलांच्या यादीत समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. यादीत नाव आढळून न आल्यास संबंधित महिलांनी दि. २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी आणि नोंदणी प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ७५८८२०१२७५ वर संपर्क साधावा, असेही नगरपंचायतीने कळविले आहे.

error: Content is protected !!