
कुडाळ : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी रविवारी कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट देत संघाच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला.
सतीश मराठे यांनी संघाच्या साधना बाजार, गॅस विभाग, साधना बाजार पॅकिंग विभाग तसेच खत गोदामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत संघाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी घरगुती गॅस वितरण प्रणालीमध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच ग्रामीण भागात नेटवर्कच्या समस्येमुळे गॅस वितरण करताना येणाऱ्या अडचणींबाबत मराठे यांच्याशी चर्चा केली. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले. तसेच सध्याच्या बाजारभावातील चढ-उतारांबाबतही यावेळी चर्चा झाली.
श्री. मराठे यांनी सहकारी संस्थांनी बदलत्या परिस्थितीनुसार व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त करत उपाध्यक्ष व संचालकांना सहकार क्षेत्रातील व्यावसायिकतेबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार भारती शाखेच्या स्थापनेत श्री. मराठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. २०१८ पासून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी मंडळावर संचालक म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२४ पासून को-ऑपरेटिव्ह बँकिंग ॲडव्हायझरी कमिटीचे प्रमुख सदस्य तसेच नाबार्डच्या संचालकपदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. सरकार आणि सहकारी संस्था यांच्यातील दुवा म्हणून सहकार भारतीच्या माध्यमातून त्यांची देशभरात महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.










