ठळक घडामोडी

ओरोस–डॉन बॉस्को–पिंगुळी शालेय बसफेरी अनियमित वेळेत; कुडाळ युवासेना आक्रमक!

पालकांसह एसटी आगारावर धडक; प्रशासनाला धरला धारेवर
बसफेरी वेळेवर सोडण्याचे आगार प्रशासनाचे आश्वासन

कुडाळ : प्रतिनिधी
      ओरोस–डॉन बॉस्को–पिंगुळी या मार्गावरील विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी बसफेरीतील अनियमिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसफेरी वारंवार निर्धारित वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांसह युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज कुडाळ एसटी आगारावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. त्यावर एसटी प्रशासनाने बसफेरी निर्धारित वेळेत सोडण्याचे आश्वासन दिले.
       या बसफेरीत विद्यार्थ्यांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. बस वेळेवर न येणे, विद्यार्थ्यांना उशिरा घरी पोहोचविणे, पालकांना कोणतीही कल्पना न देता विद्यार्थ्यांना वाटेत उतरविणे, अर्ध्या रस्त्यात सोडणे, दुसऱ्या बसमध्ये चढविणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसमध्ये पॅसेंजर घेऊन विद्यार्थ्यांना उभे ठेवणे, अशा प्रकारांमुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
       आज शाळा दुपारी १ वाजता सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध न झाल्याने पालकांनी युवासेनेशी संपर्क साधला. त्यानंतर युवासेना कुडाळ तालुका प्रमुख सागर वालावलकर, युवतीसेना तालुका प्रमुख गायत्री गोलम, तालुका सचिव साईराज दळवी, कुमार राठोड यांच्यासह पदाधिकारी आणि पालकांनी कुडाळ एसटी आगार गाठले.
यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांच्याशी चर्चा करताना पालकांनी बससेवेतील समस्यांचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांच्या वेळेशी तसेच सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसफेरी नियमित करण्याची मागणी करण्यात आली. सुरुवातीला समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने युवासेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. यानंतर आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी संबंधित बसफेरी नियमित आणि निर्धारित वेळेत सोडण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन पालक आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिले.
      या शालेय बसफेरीचा दररोज जवळपास ९० विद्यार्थी लाभ घेतात. मात्र, बससेवेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच दैनंदिन वेळापत्रक प्रभावित होत असल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना वेळेत घरी पोहोचविणे आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी असल्याने भविष्यात अशा प्रकारची गैरसोय होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एसटी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची बसफेरी नियमित वेळेत सुरू ठेवावी, अन्यथा पुन्हा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही पालक आणि युवासेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

error: Content is protected !!