
कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी एकच्या सुमारास मगरीला जेरबंद
भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी
कुडाळ : प्रतिनिधी
पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळून आलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्याला अखेर यश आले असून, पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने तत्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. काही क्षणांतच मगरीच्या दर्शनाची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच गोंधळपूरचे पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली व मंगेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सरपंचांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक व्यवस्था केली.
यानंतर वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही बचाव पथकाला पूर्ण सहकार्य केले. काल रात्री उशिरापर्यंत मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.
आज सकाळपासून पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. अखेर दुपारी एकच्या सुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला यशस्वीपणे जेरबंद केले. यावेळी वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
मगर पकडण्यात आल्याची माहिती परिसरात पसरताच ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर मगरीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याने भूपकरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.









