
वाहनचालकांना राख्या बांधून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे – पोलीस निरीक्षक विकास बडवे
कुडाळ : प्रतिनिधी
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ‘रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने कुडाळ येथे आज ‘सुरक्षा राखी’ हा विशेष जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कुडाळ पोस्ट ऑफिस चौक येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कुडाळ पोलिसांकडून वाहनचालकांना राख्या बांधून सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांनी रक्षेचा धागा आणि रस्ते सुरक्षेचा संदेश यांची सांगड घालत नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, वाहन चालविताना वेगावर नियंत्रण, मद्यपान करून वाहन न चालविणे, मोबाईल फोनचा वापर टाळणे तसेच रस्त्यावर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे याबाबत वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, अंमलदार प्रमोद काळसेकर, ममता जाधव, वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर, शाम भगत, सिद्धेश चिपकर, संदीप वराडकर, महेश जळवी, साई जळवी आदी उपस्थित होते.
यावेळी वाहनचालकांना राख्या बांधून वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर आणि सुरक्षित प्रवास याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी. नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले. दरम्यान वाहनचालकांसमवेत पत्रकारांनाही पोलिस भगिनींनी सुरक्षा राखी बांधली.









