ठळक घडामोडी

अकरा वर्षांनंतरची दोडामार्ग आमसभा गोंधळात; जनतेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

पोलिसांच्या हस्तक्षेप; रस्ते-पाणी-आरोग्याचे प्रश्न राहिले बाजूला

दोडामार्ग आमसभेत राजकीय वादाने गोंधळ

दोडामार्ग : प्रतिनिधी
        तब्बल अकरा वर्षांनंतर झालेल्या दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेकडून विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, प्रश्नोत्तरांच्या वेळी झालेल्या राजकीय वादामुळे सभेला गालबोट लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे पदाधिकारी रविकिरण गवस यांच्याशी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची धक्काबुक्की झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
      आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) रविकिरण गवस यांनी प्रश्न उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई सुरू असताना त्यांना व्यासपीठावर स्थान कसे देण्यात आले? असा सवाल त्यांनी केला. यावरून वाद वाढला. त्यांचा माईक काढून घेण्यात आला आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. शिंदे शिवसेनेचे सूर्या नाईक यांनी गवस यांच्या डोक्यावर मागून हाताने मारल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, उपसभापती तथा शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला.
       गोंधळ वाढताच आमदार केसरकर यांनी हस्तक्षेप करत सभागृहात शिस्त राखण्याचे आवाहन केले. सभाध्यक्ष म्हणून रविकिरण गवस यांना खाली बसण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी ऐकले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नंतर गवस यांना बोलण्याची संधी देण्यात आल्याचेही केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस आणि रविकिरण गवस यांनी घटनेचा निषेध केला. जनतेचे प्रश्न मांडताना विरोधकांशी धक्काबुक्की करणे हा लोकशाही मार्ग नसून हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप त्यांनी केला. तर गणेशप्रसाद गवस यांनी काही विरोधकांनी सभा मुद्दाम चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.
       अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या आमसभेत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि रखडलेल्या विकासकामांवर ठोस निर्णय होतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, राजकीय वादामुळे विकासाचे प्रश्न मागे पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
       आमसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्याचे लोकशाही व्यासपीठ आहे. प्रश्न विचारणे हा विरोधकांचा अधिकार, तर त्यावर उत्तर देणे आणि कार्यवाही करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. राजकीय मतभेदांपेक्षा तालुक्याच्या विकासाला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

error: Content is protected !!