
माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा; स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी नुकतेच टोल वापर शुल्काचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या टोलच्या दरांमुळे सिंधुदुर्गवासीयांवर आर्थिक बोजा पडणार असून स्थानिक वाहनधारकांची होणारी टोल लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
ओसरगाव टोल नाक्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना प्रवास पूर्णपणे टोलमुक्त करण्यात यावा, अशी मागणी आपण यापूर्वीही पत्रव्यवहाराद्वारे केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याचे मध्यवर्ती प्रशासकीय ठिकाण असल्याने नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार जिल्हा मुख्यालयात जावे लागते. तसेच शासकीय कर्मचारीही या मार्गावरून दररोज ये-जा करतात. त्यामुळे टोलवसुली सुरू झाल्यास जिल्हावासीयांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरांच्या तुलनेवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या वाहनांसाठी पहिला टप्पा ६५ रुपये असताना, ओसरगाव टोलच्या जाहीर केलेल्या दरांमध्ये छोट्या वाहनांसाठी पहिला टप्पा १२५ रुपये ठेवण्यात आला आहे. या दरातील मोठ्या फरकामुळे सिंधुदुर्गवासीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सिंधुदुर्गातील वाहनांना ओसरगाव टोलवर पूर्ण टोलमाफी मिळालीच पाहिजे. अन्यथा हा टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला. सिंधुदुर्गवासीयांची होणारी ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी जिल्हावासीयांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारण्यास पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.










