ठळक घडामोडी

कुडाळ मच्छीमार्केट मधील कचरा विघटन मशीन हटवा अन्यथा उपोषण!

परिसरातील नागरिकांचा नगरपंचायती प्रशासनाला इशारा

कुडाळ : येथील नगरपंचायतीच्यावतीने  मच्छी मार्केट परिसरात बसविण्यात आलेल्या कचरा विघटन मशीमधून सतत दुर्गंधी येत आहे. लहान मुले व वृध्दांच्या आरोग्याला श्वसनाचा धोका निर्माण झालेला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन सदर मशीन आमच्या परिसरातून त्वरीत हटवावी अशी मागणी तेथील नागरीकांनी कुडाळ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अन्यथा उपोषण छेडण्याचा इशाराही नागरीकांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला.
     मच्छीमार्केट परिसरातील नागरीकांनी आज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, विजय प्रभू , कान्हा केसरकर, मंगेश शेलटे, केतन वर्दम, शिवाजी सुतार, अनिल शारबिद्रे, जयसिंग शारबिद्रे, जितेंद्र सावंत, बंटी पावसकर, सागर माळकर, एकनाथ माळकर, अनिल शारबिद्रे, सुहास पिळणकर, गणपत परब, भरत आकेरकर, विपुल करलकर,  संजय बोभाटे साहील गोलंदाज मुजफ्फर, पक्या चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.
      न.पं.ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ मच्छी मार्केट येथील आम्ही कायम रहीवाशी असून आमच्या परिसरात नगरपंचायतीच्यावतीने  कचरा विल्हेवाट लावण्याची मशिन बसविण्यात आली. मात्र या मशीनमुळे आमच्या परिसरातील नागरीकांना दुर्गधी येत आहे. मशीनमधुन सतत दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे लहान मुले व वृध्दांच्या आरोग्याला श्वसनाचा धोका निर्माण झाला आहे. माशा, डासमुळे रोगराई पसरण्याची भिती आहे. तसेच परिसरातील नैसर्गिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार आहेत. स्वच्छता बिघडणार आहे.  मच्छी मार्केटमधील मच्छी विक्रते व येणारे ग्राहक यांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर परिसरात मटण, चिकन विक्रेते, हॉटेल, सरबत दुकाने असून त्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही दुर्गंधीचा त्रास होत आहे. आरोग्यदृष्टीने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याची आम्हाला जाणीव आहे. परंतु ही मशिन दाट लोकवस्तीत न बसविता शहराबाहेर विस्तृत निर्जन जागी स्थलांतरीत करावी. आपण प्रत्यक्ष जागेवर पहाणी करून आमच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन सदर मशीन आमच्या वस्तीच्या परिसरातून त्वरीत हटवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

error: Content is protected !!