
रक्षाबंधनानिमित्त सिंधुदुर्ग पोलिसांचा अनोखा उपक्रम; वेंगुर्लेत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती
वाहनचालकांना राखी बांधून दिला वाहतूक नियम पाळण्याचा संदेश
वेंगुर्ले : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ले-मठ तिठा येथे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना राखी बांधून त्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम तसेच जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती अरीफा मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार मंगेश सुर्वे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप गोसावी, महिला पोलीस अनुराधा वागतकर आणि कॉन्स्टेबल सत्वशील जाधव यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा, वाहनांची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अशा सूचना देण्यात आल्या. चारचाकी वाहनचालकांनी प्रवासादरम्यान सीटबेल्टचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनुराधा वागतकर यांनी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना राख्या बांधून त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. ‘राखीचे बंधन जपा आणि वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षा करा’, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या या उपक्रमाला वाहनचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.









