
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई
संशयित वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात; पुढील चौकशी सुरू
सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ला पोलीस ठाणे गुरनं. ८९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील पणजी येथून शिताफीने ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेशनगर, कोलवले, गोवा) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे, अशी माहीती सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी पणजी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, डॉमीनिक डिसोझा, पोलीस हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, महेश्वर समजिस्कर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने ही कारवाई केली.









