
वादळी हवामानामुळे मासेमारी ठप्प; गुजरातच्या नौका देवगड बंदरात सुरक्षित
देवगड : समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळल्याने मासेमारी धोकादायक बनली असून गुजरातमधील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी आनंदवाडी (देवगड) बंदरात आश्रय घेतला आहे.
खलाशी आणि नौकांच्या सुरक्षेचा विचार करून मत्स्यव्यवसाय विभागाने या नौकांना तात्पुरता प्रवेश दिला.
देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकूल हवामानामुळे गुजरातच्या नौकांनी सुरक्षित आश्रयाची विनंती केली होती. त्यानुसार सर्व नौकांना बंदरात प्रवेश देण्यात आला असून मत्स्यव्यवसाय विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक नौकांची नोंदणी व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
हवामान सुधारल्यानंतर या नौका पुन्हा आपल्या ठिकाणी रवाना होणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत देवगड बंदराने गुजरातच्या मासेमारांना दिलेला सुरक्षित आश्रय आंतरराज्यीय सहकार्याचे उदाहरण ठरले आहे.










