
१ सप्टेंबरपासून कुडाळ-कविलकाटे रस्त्यावरील खड्डे बुजवणार; सा.बां.चे आश्वासन
हालचाल रजिस्टरवरूनही शिवसेनेचा संताप; पोलिसांना पाचारण केल्याने वातावरण तंग
कुडाळ : कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयावर धडक देत सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांना घेराव घालत धारेवर धरले.
कुडाळ-कविलकाटे रस्त्यासह शहरातील अन्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी कार्यालयातील हालचाल रजिस्टर व हजेरीपटाची मागणी करण्यात आली. मात्र, हालचाल रजिस्टर सायंकाळपर्यंत उपलब्ध न झाल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा २०२१ पासून बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांना पाचारण केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. मात्र, कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असल्याची भूमिका स्पष्ट केली.
अखेर सहाय्यक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांनी १ सप्टेंबरपासून कुडाळ-कविलकाटे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे, तसेच चार दिवसांत पुलानजीक रेलिंग बसविण्याचे लेखी आश्वासन दिले. शहरातील अन्य रस्त्यांवरील खड्डेही तातडीने बुजविण्याचे आश्वासन देण्यात आले. हालचाल रजिस्टरच्या मुद्द्यावर मात्र उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
यावेळी शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, अॅड. राजीव कुडाळकर, उपशहरप्रमुख चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी, आबा धडाम, संदेश सावंत, राजाराम गडेकर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.










