
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी हे विकासकामांमध्ये टक्केवारी घेत आहे. परिणामी जिल्ह््यातील विकासकामांचा बट्टयाबोळ झाला आहे. विकासकामे ही लाडक्या कार्यकर्त्यांना मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यामुळे जिल्ह््यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून यंदाही सिंधुदुर्गवासीयांना खड्डयांमधून गणेशमूर्ती आणावी लागणार आहे. विरोधक म्हणून झालेल्या निकृष्ट कामांची पोलखोल करून लोकप्रतिनिधींनी विकासकामांमध्ये घतलेल्या टक्केवारीचे कारनामे उघडकीस आणणार, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह््यातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. कारण लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्त्यांना रस्त्याची कामे मिळावी, यासाठी फिल्डिंग लावतात. ओरोस येथील रस्त्याचे काम व धर्मादायाच्या इमारतीचे काम लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील ठेकेदाराला मिळण्यासाठी टेंडर मॅनेज करण्याचे काम केले जात आहे. लोकप्रतिनिधींकडून टक्केवारीसाठी ठेकेदारांची गळचेपी केली जात आहे. जिल्ह््यात रस्त्यासह अन्य होणारी विकासकामे ही निकृष्ट झाली आहेत. ही कामे लोकप्रतिनिधींनी आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे जिल्ह््यासाठी आलेला विकासनिधी पाण्यात आणि खड्डयात गेल्याने विकासाचा बट्टाबोळ झाला आहे, असा टोला उपरकर यांनी लगावला.
मालवण तालुक्यातील एका शासकीय विभागाच्या इमारतीचे काम आपल्या कार्यकर्त्याला मिळावे, यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी हट्टहास केला. त्यामुळे सदर काम त्यांच्या कार्यकर्त्याला देण्यात आले. राज्यातील ठेकेदारांची ५८ कोटींची बिले थकीत आहेत. या प्रश्नी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. रस्त्यांच्या कामात लोकप्रतिनिधी टक्केवारी घेत असल्याने सदर कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत ती कामे कार्यकर्त्यांनी केली असल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे धारिष्ट लोकप्रतिनिधींमध्ये नाही. परिणामी खड्डेमय रस्त्यांतून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे, असा आरोप उपरकर यांनी केला.









