
२ कोटी ३७ लाखांच्या व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस)सह चौघे पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची मोठी कारवाई; कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गालगत पणदूर परिसरात प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचा अंबरग्रीस जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे. तसेच तस्करीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि कारसह पोलिसांनी एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून, संशयिताविरूद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती, एलसीबीकडून देण्यात आली.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना काही व्यक्ती प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांनी दोन पंच, वजनकाटाधारक आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत पणदूर-कडावल रस्त्यालगत सापळा रचला. दरम्यान, काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि ग्रे रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा या दोन वाहनांमधून आलेल्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचा अंबरग्रीस आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी संकेत संतोष चव्हाण (२६, रा. रवळनाथनगर, ओरोस, मूळ रा. निरूखे), महेश लक्ष्मण रेवणकर (३५, सध्या रा. कुवारबांव, रत्नागिरी, मूळ रा. रेवंडी, मालवण), अमेय पुंडलिक देसाई (३१, रा. रवळनाथनगर, ओरोस) आणि अमित अरुण अणावकर (३९, रा. अणाव, कुडाळ) यांना ताब्यात घेतले आहे. पंचनाम्याची कारवाई करून अंबरग्रीस, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद एलसीबीचे अमर कांडर यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती पोलीसांकडून देण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दिपक शेलार यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, आशीष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.










