
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह देशप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

कुडाळ : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी कुडाळ शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, देशभक्तीपर गीतांचा निनाद आणि ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’च्या घोषणांनी संपूर्ण कुडाळ शहर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनीही यात्रेत सहभागी होत देशप्रेमाचा संदेश दिला.
शहरातील भैरववाडी येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत यात्रा एस.एन. देसाई चौक (कॉलेज चौक) येथे पोहोचली. याठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला. यात्रेदरम्यान देशप्रेमाची भावना जागृत करणारी गीते वाजविण्यात आली, तर सहभागी नागरिकांनी उत्स्फूर्त घोषणाबाजी करत वातावरण भारावून टाकले.
या यात्रेत मोठ्या संख्येने देशप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभागी झाले होते. विविध वयोगटातील नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन सहभाग नोंदवत स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणित केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, रणजित देसाई, काका कुडाळकर, संजय पडते, संजय वेंगुर्लेकर, संदीप गावडे, विनायक राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, सभापती मिलिंद नाईक, श्वेता कोरगावकर, दिपलक्ष्मी पडते, राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे विवेक पंडीत, बंड्या सावंत, संध्या तेरसे, रमाकांत नाईक, पप्या तवटे, मनोज वालावलकर, अभी गावडे, विलास कुडाळकर, निलेश परब, श्रेया गवंडे, सुनिल बांदेकर, राजेश पडते, राजू गवंडे, मंगेश चव्हाण, किसन मांजरेकर, यांच्यासह मंचचे पदाधिकारी, नागरिक, लोकप्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










