ठळक घडामोडी

तिलारी नदीत दोघे वाहून गेले; उशिरापर्यंत शोध सुरू!

दोडामार्ग : प्रतिनिधी
      दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील तिलारी नदीच्या पात्रात आज सोमवारी सायंकाळी सहा वर्षीय मुलासह दोघे वाहून गेल्याची घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. मात्र या दुर्घटनेनंतर अनभिज्ञ राहिलेल्या तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागावर मात्र गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
       सदर व्यक्ती हे रोजगारासाठी घोटगेवाडी येथे मजुरीचे काम करीत होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता ते घोटगेवाडी येथील कॉजवेवर गेले होते. त्यावेळी तिलारी नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली; मात्र काही क्षणांतच ते प्रवाहात दिसेनासे झाले. घटनेची माहिती मिळताच कोनाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र नदीच्या जोरदार प्रवाहामुळे त्यात यश आले नाही. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. काही ग्रामस्थांनी ड्रोनच्या मदतीनेही नदीपात्र व परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही रात्री उशिरापर्यंत दोघांचा ठावठिकाणा लागला नाही.
     धरणातून पाणी सोडल्याने प्रवाह वाढला
      तेरवण मेढे उन्नैयी बंधारा तसेच तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचा प्रवाह वेगाने सुरू होता. पाण्याची पातळीही वाढलेली होती. याच प्रवाहात दोघे वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

error: Content is protected !!