
शेतकरी योजनांची माहिती घेण्यासाठी कृषीकन्यांचा पुढाकार; ‘महाविस्तार’ ॲपचीही घेतली माहिती
उपजिल्हाधिकारी देसाई यांचे कृषीकन्यांना मार्गदर्शन; स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत दिली प्रेरणा
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस मधील अणाव येथे कार्यरत असलेल्या कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी विकास योजना व उपक्रमांची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय, कृषी विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे भेट दिली.
या भेटीदरम्यान कृषीकन्यांनी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, कृषी विकास कार्यक्रम, तांत्रिक मार्गदर्शन व शेतकरी कल्याणकारी उपक्रमांची माहिती घेतली. तसेच महाविस्तार ॲप या डिजिटल माध्यमाची माहिती जाणून घेतली. या ॲपद्वारे कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, कृषी सल्ला व शेतकरी सेवा यांची माहिती उपलब्ध होते.
यावेळी कृषीकन्यांनी उपजिल्हाधिकारी देसाई यांचीही भेट घेतली. त्यांनी कृषीकन्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अणाव गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा कृषीकन्यांचा उद्देश आहे. या भेटीमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीसोबतच शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने कृषीकन्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले.










