
ओरोस येथे कौशल्य विकास कार्यशाळेला भेट
किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात अभ्यासदौरा
सिंधुदुर्ग : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्यांनी कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथे अभ्यासदौरा तसेच न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेला भेट देत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, जैविक निविष्ठा आणि कृषी यंत्रसामग्रीबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.
दि. ११ ऑगस्ट रोजी कृषिकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. आणि अतुल्या एम. यांनी कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथे अभ्यासदौरा केला. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत आणि बाळकृष्ण गवाडे यांनी केंद्राची भूमिका, कार्यपद्धती तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली. कृषिकन्यांनी फळ प्रक्रिया युनिट, ससा पालन, कुक्कुटपालन तसेच १५ ड्रम युनिटची प्रत्यक्ष पाहणी केली. मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या पद्धती, पशुपालन व्यवस्थापन, १५ ड्रम सिद्धांत आणि नैसर्गिक द्रवरूप खतनिर्मिती याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले.
यासोबतच ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, वेस्ट डिकम्पोझर, ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास, बिव्हेरिया, पीएसबी, केएमबी आणि अॅझोला उत्पादन याबाबतही कृषिकन्यांनी सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान, ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेलाही कृषिकन्यांनी भेट दिली. कार्यशाळेतील कृषी विभागात मांडण्यात आलेली विविध आधुनिक कृषी अवजारे, यंत्रे आणि तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी जाणून घेतली. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेतीतील कामे अधिक सुलभ, कार्यक्षम आणि वेळेची बचत करणारी कशी होतात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषिकन्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आधुनिक कृषी अवजारांचे उपयोग व फायदे तसेच शेतीतील तंत्रज्ञानाचा वाढता वापर याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत कृषीविषयक विविध प्रश्न विचारले.
या दोन्ही उपक्रमांमुळे कृषिकन्यांना आधुनिक व शाश्वत कृषी पद्धती, जैविक निविष्ठा, कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन, पशुपालन आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचे व्यावहारिक ज्ञान मिळाले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती व कृषी तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली. भविष्यात शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी योजना आणि शाश्वत शेती पद्धतींची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.










