ठळक घडामोडी

कुडाळच्या विकासाला आमदार निलेश राणेंकडून ३ कोटी ३० लाखांचा निधी!

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंची माहीती

प्रत्येक वॉर्डातील विकासकामांना मिळणार गती; मोकाट जनावरांसाठी गोशाळा, रस्ते काँक्रीटीकरणासह अनेक कामांचा समावेश

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहराच्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहीती शिंदे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
       कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.गावडे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर, अॅड.राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर,श्रुती वर्दम, उपशहरप्रमुख चेतन पडते, आबा धडाम, रेवती राणे, रोहीत भोगटे, राजवीर पाटील, प्राजक्त चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
         शहरप्रमुख अभिषेक गावडे म्हणाले, ३ कोटी ३० लाखांचा आमदार निधी शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डातील विकासकामांसाठी आमदार नीलेश राणे यांनी आमदार फंडातून हा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत विविध विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. यात नाबरवाडी आणि कवीलकाटे परिसरातील अनेक वर्षांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार निधीतून दोन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करून आणखी एका विहिरीसाठी तात्काळ निधी मंजूर करून घेण्यात आला.
    मोकाट जनावरांचा बंदोबस्त: शहरातील रस्त्यांवर भटकणाऱ्या गुरांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गोशाळा/कोंडवाड्याकरिता १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण: अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण, कुडाळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण आणि नगरपंचायत इमारतीमधील नाना-नानी पार्कचे काम हाती घेण्यात येणार आहे.
नियोजन मंडळाकडून पाठबळ: येत्या काळात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातूनही शहरासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर करण्यासाठी नगरपंचायतीमार्फत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर व नगरसेवक गावडे यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!