
आमदार निलेश राणेंची उपस्थिती; पंचायत समितीचे आयोजन
सभापती मिलिंद नाईक-उपसभापती सिताराम तेलींची माहीती
कुडाळ : कोकणच्या मातीत आणि पावसाळी ऋतूत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचा प्रचार-प्रसार आणि पौष्टिक व औषधी गुणधर्मांची जनजागृती करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे रानभाजी प्रदर्शन, पाककृती स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव होणार असून, तालुक्यातील बचत गट सदस्य तसेच पंचायत समितीअंतर्गत अधिकारी व कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व जनतेपर्यंत
पावसाळ्यात कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात विविध रानभाज्या उपलब्ध होतात. नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या भाज्यांमध्ये पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म असतात. मात्र, अनेक रानभाज्यांची आणि त्यांच्या विविध पाककृतींची माहिती सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे पारंपरिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चव, पोषणमूल्य अन् मांडणीवर गुणांकन
पाककृती स्पर्धेतील सहभागींचे चव, पौष्टिक मूल्य, मांडणी/प्लेटिंग आणि स्वच्छता या प्रमुख निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक चव आणि आधुनिक सादरीकरणाचा अनोखा संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे.
विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
प्रथम क्रमांक : ७,००० रू., प्रमाणपत्र + सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : ५,००० रू., प्रमाणपत्र + सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : ३,००० रू., प्रमाणपत्र + सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ : ५ स्पर्धकांना प्रत्येकी १,००० रू., प्रमाणपत्र
३१ ऑगस्टपर्यंत नोंदणीची संधी
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आपली नावे कृषि विभाग, पंचायत समिती कुडाळ येथे जमा करावीत.
संपर्क : सोनिया पालव, विस्तार अधिकारी (कृषि) – ९४०४४३९५७५
संदेश परब, विस्तार अधिकारी (कृषि) – ९४२३८८१६६६
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती तुकाराम उर्फ दादा साईल, शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष मंगेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विशेष उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप, तहसीलदार सचिन पाटील आणि तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले उपस्थित राहणार आहेत.
जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन
कोकणच्या पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व जपण्यासोबतच त्यांच्या विविध पाककृतींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी पाककला स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक व उपसभापती सिताराम तेली यांनी केले आहे.










