ठळक घडामोडी

मालवणात शिवकालीन परंपरेचा नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात!

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण; व्यापारी व मच्छिमार बांधवांनी घातले साकडे

आमदार निलेश राणेंच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण; माजी आमदार वैभव नाईक यांनीही सागराला श्रीफळ केले अर्पण

मालवण : महेश कदम
     उत्साहपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात मालवणातील शिवकालीन परंपरा लाभलेला ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव आज उत्साहात साजरा झाला. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण झाल्यावर मालवणातील तमाम नागरिक, व्यापारी व मच्छिमार बांधवांनी सागराला श्रीफळ अर्पण करून साकडे घातले.
     नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचा श्रीफळ अर्पण करण्यात आला. याच दरम्यान मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथून व्यापारी बांधवानी वाजत गाजत श्रीफळाची बंदर जेटीपर्यंत मिरवणूक काढल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर व्यापारी संघातर्फे आणण्यात आलेल्या श्रीफळाचे मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मालवणचे आमदार निलेश राणे हे उपस्थित होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला श्रीफळ अर्पण झाल्यावर नेरुरकर यांनी व्यापारी बांधवांच्या वतीने सागराला श्रीफळ अर्पण करून “मालवण वासीयांच्या धंद्यात बरकत दि” आणि सगळ्यांका सुखी ठेव असे गाऱ्हाणे घातले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थित राहून सागराला श्रीफळ अर्पण केला. यावेळी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, अशोक सावंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण सभापती आणि भाजपच्या महिला शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, ललित चव्हाण, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, आरोग्य नगरसेविका मेघा सावंत, अश्विनी आचरेकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, सौ. दीपलक्ष्मी पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर,महेश लुडबे बाबा परब, बबन शिंदे, सतीश आचरेकर, गणेश प्रभूलकर, प्रमोद ओरसकर, सुहास ओरसकर, नाना पारकर, रवी तळाशीलकर, अभय कदम, , मंदार केणी, , बाळू अंधारी, स्वप्नाली नेरुरकर, राजू बिडये, जेम्स फर्नांडिस, हरी खोबरेकर, बाबी जोगी आदी व इतर व्यापारी व मच्छिमारी बांधव, राजकीय मंडळी, पर्यटन व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बंदर जेटी परिसर व समुद्रकिनारा गर्दीने फुलून गेला होता. जेटी परिसरात युवक व बच्चेकंपनीमध्ये नारळ लढविण्याचा खेळ रंगला होता. तसेच यावेळी किनाऱ्यावर आयोजित कबड्डी स्पर्धा रंगली. तसेच नारळी पौर्णिमेनिमित्त यावर्षीही मालवण बंदर जेटीवर विविध आयोजकांच्या वतीने महिला व पुरुषांसाठी नारळ लढविण्याच्या स्पर्धा रंगल्या.

error: Content is protected !!