
सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या
विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
कुडाळ : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडा या प्रशालेत एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावर्षी भारतीय डाक घर यांच्या एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमामध्ये या शाळेने उत्साहाने सहभाग घेतला. सैनिकांसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने विविध तऱ्हेच्या विविध रंगी राख्या तयार केल्या. डाकघर उपक्रमांतर्गत राखी बंधन पाकिटे घेऊन त्यात शुभेच्छापत्र व राख्याभरून पाठवण्यात आल्या. यावेळी डाकघर कर्मचारी विकास वर्मा व गिरीश बोवलेकर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. या उपक्रमाचा हेतू व महत्त्व सांगितले. सीमेवरती जे सैनिक सर्व भारतीयांचे ऊन थंडी पाऊस कशाची तमा न बाळगता संरक्षण करतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहून सदैव देशासाठी लढतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत आमच्या प्रशालेने सुमारे 170 राख्या बंधन पाकीटात भरून डाकघर मार्फत पाठवल्या.
या उपक्रमात सर्व विद्यार्थी , पालक, मुख्याध्यापिका सायली कदम, शिक्षक विजय धामापूरकर, वंदना परब, ऋतुजा गावडे, चैत्राली पाटील, स्वराली लाड, गुरुप्रसाद सावंत, गौरी गोसावी, दिपाली मोहिते आदी सहभागी होते. राख्या सुपुर्द करताना सामाजिक कार्यकर्ते अरविंद करलकर व सर्व पालकही बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व स्तरातून प्रशालेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.









