
वैभववाडी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले. एसटी चालकाने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये एसटी व कार या दोन्ही वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी कारचालकाने राजापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात कारमधील तिघे जखमी झाले आहेत. हे तिघेही शिरगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक कार घेऊन सिंधुदुर्ग शिरगाव येथून आपल्या मित्रांसह प्रवास करत होते. ते कारने केळवली-पाचल मार्गे अणुस्कुरा दिशेने पुणेकडे जात असताना वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा रिंगेवाडी खारेपाटण एसटी बस ही केळवली फाटयावरील जामददा पुलाच्या जवळ आली असताना वळणाच्या रस्त्याच्या परिस्थितीकडे योग्य लक्ष न देता एस. टी. चालकाने बस भरधाव वेगात चालविल्याने या बसने समोरून येणाऱ्या या कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यावर एसटी बस बरोबर फरफटत गेली. या अपघातात कार मधील तीन जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हेडकाँस्टेबल रहिम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. राजापूर एसटी प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच राजापूर अगार प्रमुख काव्या पेडणेकर, वाहतुक नियंत्रक अजय सिडाम यांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर विभागीय वाहतूक अधीक्षक सिंधुदुर्गचे निलेश लाड यांनी देखील तात्काळ अपघातस्थळी भेट दिली. या अपघातत एसटी बस व कारचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.










