
ग्रामीण जनतेला एसटी सवलतीचा मोठा लाभ; निरुखेत २०० ग्रामस्थांना मोफत NCMC कार्ड वाटप
प्राजक्त चव्हाण यांच्या पुढाकारातून सेवाभावी उपक्रम; ग्रामीण जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
निरुखे-पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडविले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असून, एसटी बस प्रवास सवलतीसाठी मोफत एनसीएमसी (NCMC) कार्ड वाटप हा स्तुत्य व सामाजिक उपक्रम आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निरुखे येथे केले.
शिवसेनेच्या वतीने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने निरुखे ग्रामपंचायत हॉलमध्ये सुमारे २०० ग्रामस्थांना एसटी बस सवलत असलेले NCMC कार्डची मोफत नोंदणी तसेच कार्ड वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे, श्रमिक कामगार कल्याणकारी संघटना राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्यासह प्रथमेश केळबाईकर, किरण नाईक, सत्यवान गुरव, संस्कृती पालव, सिद्धी तेर्से, रिया नाईक, काव्या तेर्से, बाळकृष्ण तेर्से, मुकेश पालव, बी.एल. तेर्से, रामदास करंदीकर, विष्णू नाईक, सुनील परब, सरिता तेर्से, रोशन गावकर, प्रसाद नाईक, बबन मेस्त्री, सुहास तेर्से आदी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले, प्राजक्त चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने गावातील सर्वसामान्य व गरीब ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कॅम्पचे आयोजन केले. युवकाने स्वतःचा वेळ देऊन जनतेसाठी तळमळीने काम करणे कौतुकास्पद आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या अशा कार्यकर्त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
दादा साईल म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या एसटीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. गेल्या दीड वर्षात कुडाळ-मालवण भागात सुमारे २५ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
निरुखे गावाच्या विकासाबाबत बोलताना साईल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत गावात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे झाली आहेत. खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. तसेच गावचा सुपुत्र प्राजक्त चव्हाण यांच्यामार्फत विविध शासकीय योजना व उपक्रम ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले.










