ठळक घडामोडी

चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

गंभीर जखमी अवस्थेत ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल

मालवण पोलिसांकडून तपास सुरू

मालवण : महेश कदम
        मालवण तालुक्यातील चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीमध्ये स्वतःच्या गळ्यावर आणि शरीरावर धारदार सुरीने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
     गडहिंग्लज-निलजी येथून चौके परिसरात चिरे भरण्यासाठी आलेल्या वाहनावर सदर तरुण क्लीनर म्हणून काम करतो. आज सकाळी तो चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीवर गेला असताना, त्याने सोबत आणलेल्या धारदार सुरीने स्वतःच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर वार करून घेतले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
     वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिली मिठारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेमंत धुरी, सुहास पांचाळ, सूरज रेडकर आणि साळेलचे पोलीस पाटील रवींद्र गावडे यांनी चौके आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली. पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत संबंधित तरुणाने स्वतःहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितल्याचे समजते.
     जखमी तरुणाला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, नांदरूखचे सरपंच भाऊ चव्हाण, बंड्या गावडे, मानस गावडे, अमोल चव्हाण, साई गावडे व गोठ्या गावडे ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. या घटनेमुळे चौके आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!