ठळक घडामोडी

अभिषेक गावडे यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून तात्काळ दखल; दोन दिवसांत कुडाळ शहरातील खड्डे बुजविण्याचे आश्वासन!

तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्या तातडीच्या सूचना

रेल्वे स्टेशन–आंबेडकरनगर रस्त्यावर नवीन ब्रिजवर सुरक्षेसाठी रेलिंग बसवा; अभिषेक गावडे यांची सा.बां. विभागाकडे मागणी

कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, यासाठी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली होती. या निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, दोन दिवसांच्या आत संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आल्याची माहीती अभिषेक गावडे यांनी दिली.
    कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कविलकट्टा, रेल्वे स्थानक रस्ता तसेच नाबरवाडी परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत गणेश चतुर्थी उत्सव सुरू होत असून, या काळात कुडाळ शहरात नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित व सुस्थितीत करावेत, अशी मागणी अभिषेक गावडे यांनी केली होती.
     या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत दोन दिवसांच्या आत खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करून ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
     नवीन ब्रिजवर रेलिंग बसविण्याची मागणी!
    दरम्यान, कुडाळ रेल्वे स्टेशन ते आंबेडकर नगर या मार्गावर झालेल्या नवीन ब्रिजच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेलिंग तात्काळ बसविण्यात यावे, अशी मागणीही अभिषेक गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या ठिकाणी रेलिंग नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबतही तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
     “गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेल्या मुदतीत काम झाले नाही तर शिवसेना पक्षाच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल,” असा इशारा अभिषेक गावडे यांनी दिला.
     यावेळी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, उपशहरप्रमुख चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, युवा सेना कुडाळ शहरप्रमुख आबा धडाम, युवा सेना उपशहरप्रमुख प्रथमेश कांबळी, अजिंक्य नाईक आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!