
आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्र्यांकडे केली होती मागणी
ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा; शटल सेवेलाही मिळणार बळ
कुडाळ: प्रतिनिधी
कुडाळ एसटी आगारात आणखी ५ नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे-दापोडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेतून या “राजमाता जिजाऊ” ३ बसेस (बीएस ६ मॉडेल) उद्या सोमवारी कुडाळ येथे दाखल होतील. तसेच आणखी दोन बसेस मंगळवारपर्यंत अशा एकूण ५ बसेस उपलब्ध होतील. त्यामुळे कुडाळ आगारातील एकूण नवीन बसेसची संख्या १५ होणार आहे.
यापूर्वी १० लालपरी बसेस नव्याने आगाराच्या ताफ्यात धावत आहेत. या बसेस लांब पल्ल्याच्या बससेवेसाठी धावत आहेत. आता नव्याने ५ राजमाता जिजाऊ बसेस दाखल होणार असून या बसेस तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शटल बससेवेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ आगारास नवीन बसेस मिळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार, आमदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुरव्याला यश आले आहे. दरम्यान लवकरच नवीन बसेसच्या लोकार्पणचा कार्यक्रम आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी दिली.










