
जिल्हा परिषद, राजकीय, सहकार व धार्मिक कामकाजामुळे विद्यालयासाठी वेळ देता येत नसल्याचे नारकर यांचे स्पष्टीकरण
कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचे सेक्रेटरी केशव उर्फ दीपक रमेश नारकर यांनी आपल्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांकडे लेखी राजीनामा सादर केला असून, तो मंजूर करण्याची विनंती केली आहे.
दीपक नारकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेल्या १२ वर्षांपासून शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे सेक्रेटरी पदावर काम करीत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याने जिल्हा परिषदेतील विविध बैठका, विषय व समस्यांवरील बैठका तसेच आरोग्य विभागाशी संबंधित बैठका यासाठी वेळ द्यावा लागत आहे. याशिवाय आमदार निलेश राणे यांच्याशी संबंधित राजकीय कामकाज, सहकार क्षेत्रातील जबाबदाऱ्या तसेच धार्मिक क्षेत्रातील विविध कामकाजामुळे विद्यालयासाठी आवश्यक तेवढा वेळ देता येत नसल्याचे नारकर यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत सेक्रेटरीपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गेल्या बारा वर्षांच्या कार्यकाळात विद्यालयाच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांचे आभार मानले आहेत. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचेही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. “आपण दिलेल्या संधीबद्दल मनःपूर्वक आभार. भविष्यात शिवाजी विद्यालय हिर्लोकची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच प्रार्थना,” अशी भावना दीपक नारकर यांनी आपल्या राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे.










