ठळक घडामोडी

कुडाळात अन्नपदार्थ-पाणी तपासणी मोहीम; २५० हून अधिक नमुने संकलित!

व्यावसायिकांना मोठा दिलासा; कुडाळातच अन्नपदार्थ-पाणी तपासणीची सुविधा

व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेच्या पुढाकाराने अन्नसुरक्षा तपासणी मोहीम; व्यावसायिकांचा समाधानाचा सूर

कुडाळ : प्रतिनिधी
         अन्नसुरक्षा मानकांच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात अन्नपदार्थ व पाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत कुडाळ तालुक्यातील अन्नपदार्थाशी संबंधित व्यावसायिकांकडून २५० हून अधिक अन्नपदार्थ व पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले.
      मिरज येथील एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे कर्मचारी कुडाळातील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात दाखल झाले होते. अन्नसुरक्षा नियमांनुसार हॉटेल व खाद्यपदार्थ व्यावसायिकांसाठी ही तपासणी आवश्यक असली, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांना कोल्हापूर, पुणे, मिरज, मुंबई किंवा ठाणे येथे जाऊन तपासणी करून घ्यावी लागत होती. त्यामुळे वेळ व आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होत होता.
      ही अडचण लक्षात घेऊन व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ आणि जिल्हा हॉटेल संघटनेने संयुक्त पुढाकार घेत मिरज येथील प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांना कुडाळातच पाचारण केले. एकत्रितपणे तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने हॉटेल चालक व खाद्यपदार्थ व्यावसायिकांना तुलनेने सोयीच्या दरात तपासणी करून घेता आली.
       या उपक्रमामुळे कुडाळ तालुक्यातील हॉटेल चालक-मालक व संबंधित व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष पी. डी. शिरसाट, महासंघाचे उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, खजिनदार नंदन वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक, अमित सुखी तसेच कुडाळ तालुका व्यापारी संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!